महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा एकेका रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काळीं जिभा फुटल्या, तर तो जे सांगेल ते ऐकुन प्रेते उठतील. कबंधे जिवंत होतील. षंढांच्या अंगी वारे भरेल! असा सांस्कृतिक आणि समरतीर्थांचा महाराष्ट्रात अपूर्व योग घडून आला आहे. स्वातंत्र्यप्रियता ही तर महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती. अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या काळासर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युध्दश्री, ती रग, तो आवेश, अजूनही मावळला नाही. कधी मावळेलसे दिसतहि नाही. हा गुण डोंगरावरुन वाहत येणार्या भराट वार्याचा आहे.कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. स्वाभिमानी तर आहेच आहे. कणखर आहे. चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही. मित्रांसाठी जीव देणारा आहे. भक्तीभावाने गहिवरणारा आहे. लढताना प्राण तळहाती घेणारा आहे. थोडासा भांडखोरही आहे. थोडीशी हिरवटपणाची झांक आहे. पण किती? चंद्रावरल्या डागाएव्हढी. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला,त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे. आथित्यशील आहे. किंबहुना तो आहे गिरीशिखरांच्या दैवतासारखा. शंभुमहादेवासारखा. संतापला तर त्रिभुवने पेटवील. संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहवील.
- गो.नी.दा.
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comment:
Sahi...
Thanks for such a good para.....
Post a Comment